लातूर : यंदा वरुणराजाने दमदार बरसात केल्याने खरीपातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सध्या शेती कामे सुरु असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे घटली आहेत. जिल्ह्यात २ हजार ४३ कामांवर १ लाख ४० हजार २८९ मजूर काम करीत आहेत.
कुठल्याही मजुराची उपासमार होऊ नये. तसेच त्यांना गावातच हाताला काम मिळावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतर थांबण्यास मदत होत आहे. यंदा जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला. आतापर्यंत जवळपास ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सतत रिमझिम, मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असल्याने पिकेही चांगली बहरली असून सध्या पिकांत तण वाढले आहे. त्यामुळे आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच खुरपणी, फवारणीची कामे सुरु आहेत. परिणामी, मग्रारोहयोवरील मजुरांची संख्या घटली आहे.
४४६ गावांमध्ये २ हजार कामे...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४४६ ग्रामपंचायतीअंतर्गत २ हजार ४३ कामे सुरु आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत हाताला काम नसल्याने मजुरांची भटकंती होत होती. त्यामुळे मग्रारोहयाेच्या कामांची संख्या वाढली होती. आता शेती कामांमुळे ही कामे कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
सिंचन विहिरींची सर्वाधिक कामे...कामे - मजूरसिंचन विहीर - ८६५०२बांबू लागवड - १९३२घरकुल - ९७१०वृक्ष लागवड - ३६८०रस्ता - ३१११४शेततळे - ९०जनावरांचा गोठा - ६६३१ग्रामपंचायत भवन - ६३०
११ लाख मजूर क्षमतेची कामे सुरु...सध्या जिल्ह्यात ११ लाख ७७ हजार १३९ मजूर क्षमतेची २ हजार ४३ कामे सुरु आहेत. प्रत्यक्षात त्यावर १ लाख ४० हजार २८९ मजूर काम करीत आहेत. शेती कामे सुरु असल्याने मजूर संख्या घटली आहे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ.