शिवाजी भातमोडे
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे प्रस्थापित आणि नवख्या उमेदवारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. आपल्या मर्जीतील व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेची सरपंचपदी निवड होण्यासाठी आतापासूनच डावपेच आखले जात आहेत.
खरोसा ग्रामपंचायत १३ सदस्यांची आहे. महिला उमेदवार ७ आणि पुरुष उमेदवार ६ असणार आहेत. प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण पुरुष, महिला आणि इतर मागास प्रर्गातील पुरुष, प्रभाग २ मध्ये मागास प्रवर्गातील पुरुष, इतर मागास प्रवर्गातील महिला, प्रभाग ३ मध्ये इतर मागास पुरुष, मागास प्रवर्गातील महिला, प्रभाग ४ मध्ये सर्वसाधारण पुरुष आणि दोन महिला, तसेच प्रभाग ५ मध्ये सर्वसाधारण पुरुष, महिला आणि इतर मागास प्रवर्गातील महिला, असे आरक्षण आहे. दरम्यान, गावातील राजकारणाची व्यूहरचना आखण्यास आतापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसून येत आहे.