लातूर : परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळशाबरोबर इंधन ( bamboo will be used as fuel at Parli thermal power plant) म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे (Bamboo Eco-friendly alternative to coal) . त्या अनुषंगाने महानिर्मिती विभागातर्फे बांबू पुरवठ्यासाठी दोन दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आली आहे. बांबू तसेच जैवभार इंधन विटांचा दगडी कोळशाला १०० टक्के पर्यावरणपूरक पर्याय निर्माण झाला असून, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भात कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा बांबू लागवडीचे अभ्यासक पाशा पटेल म्हणाले, देशात प्रदूषण ही सर्वांत मोठी समस्या आहे. कोळशाचा वापर, पेट्रोल, डिझेल हे घटक वाढत्या वायुप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. त्यावर रामबाण उपाय म्हणून म्हणून ग्लास्मो येथे झालेल्या पर्यावरण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सन २०५० पर्यंत ५० टक्के कमी करण्याचा संकल्प जाहीर करत इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशाला पर्याय म्हणून बांबू आणि जैवभारावर आधारित इंधन विटाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. दोन दिवसांपूर्वी महानिर्मिती विभागाने वीजनिर्मिती केंद्रात बांबूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी निविदा काढली आहे. जालना येथील काही उद्योजकांनीही या इंधन विटा वापरण्यावर भर देणार असल्याचे चार दिवसांपूर्वी लातूर येथे झालेल्या बैठकीत सांगितले होते.
जैवभार वापरून यंत्राद्वारे इंधन विटा...शेतामधून धान्य, कडधान्य, फळे इत्यादी शेतीमालाची निर्मिती झाल्यानंतर जे कृषी अवशेष उरतात, त्यापासून या इंधन विटा तयार करता येतात. भाताचा पेंढा, गव्हाचे काड, उसाचे चिपाड, सोयाबीनचे कुटार, कपाशीच्या तुरीच्या तुराट्या, कपासीच्या पऱ्हाट्या, झाडाझुडपांच्या छाटणीमधून तयार होणारा जैवभार वापरून यंत्राद्वारे इंधन विटा तयार करता येतात, ही बाब पाशा पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
शेतीमालाला मिळेल मोठी बाजारपेठ...कार्बन उत्सर्जनास जबाबदार असणाऱ्या पेट्रोलच्या जागी बांबू व इतर शेतमालापासून बनलेल्या इथिनॉलचा वापर व्हावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर इंधन म्हणून करता यावा, यासाठी ते गाडीला फेल्क्स इंजिन बसविणे सक्तीचे करणार आहेत. या निर्णयामुळे शेतीमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून, योग्य भाव मिळणे शक्य होणार आहे. केंद्र व राज्य शासन यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड करावी, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले.