ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 01- नियमबाह्य मान्यता दिल्याच्या कारणावरून लातूरचे शिक्षण उपसंचालक कैलास गोस्वामी यांना राज्य शासनाने बुधवारी निलंबित केले असून, शिक्षण उपसंचालक पदाचा पदभार सहाय्यक संचालक एस.एम. तेलंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांतील २०१२ नंतर शिक्षक नियुक्तीला मान्यता देऊ नये, असे आदेश राज्य शासनाने दिले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून शिक्षण उपसंचालक कैलास गोस्वामी यांनी मान्यता दिल्याची तक्रार मराठा महासंग्रामचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजकुमार सूर्यवंशी-पाटील यांनी शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे तसेच प्रधान सचिवांकडे केली होती. या तक्रारीनुसार नाशिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोधने यांची तपासणीसाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने लातुरात दिल्या गेलेल्या मान्यतेसंदर्भात चौकशी करून या चौकशीचा अहवाल शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे पाठविला. अहवालात शिक्षण उपसंचालक कैलास गोस्वामी दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षण उपसंचालक कैलास गोस्वामी यांना बुधवारी निलंबित केले असून, शिक्षण उपसंचालक पदाचा पदभार सहाय्यक संचालक एस.एम. तेलंग यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
निलंबन काळात गोस्वामी यांचे मुख्यालय लातूर येथे राहणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही आदेश देण्यात आले आहेत. निलंबित काळात खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.