- हणमंत गायकवाडलातूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी अनेक गावांमध्ये दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे विकास साधता आलेला नाही. जिल्ह्यातील आठ गावांमध्ये अद्याप एसटीच पोहोचली नाही. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना टमटम, काळी-पिवळी अशा खाजगी वाहनांचा प्रवासासाठी आधार घ्यावा लागतो आहे.
जिल्ह्यातील चाटगाव, मोरवड, लिंगदाळ, मोहनाळ, आरी, सर्फराजपूर, गुणेवाडी, जोतवाडी या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी अद्याप पोहोचली नाही. तीन किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट किंवा खाजगी वाहनांचा आधार घेऊन त्यांना बस गाठण्यासाठी यावे लागते. प्रस्तुत आठ गावांना तीन किलोमीटर अंतरापर्यंत चांगला रस्ता नसल्यामुळे या गावांमध्ये एसटी पोहोचलेली नाही. जिल्ह्यात ९३५ गावे आहेत. त्यापैकी या आठ गावांमध्ये दळणवळणाची सुविधा नाही. त्यांना ऑटो अथवा काळी-पिवळी जीपचा सहारा घ्यावा लागतो. किंवा तीन कि.मी. पायी अंतर जाऊन एसटीच्या थांब्याजवळ यावे लागते.
६० ते ७० गाड्या नादुरुस्तएसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील पाच आगारांसाठी ४४० बसेस आहेत. त्यापैकी ६० ते ७० गाड्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी आगारात असतात. गाव तिथे एसटी पोहोचणार असा उपक्रम असला तरी या आठ गावांमध्ये बसेस नाहीत. नादुरुस्त बसेस दुरुस्त करून ज्या गावात एसटी जात नाही, त्या गावात बसेस सोडाव्यात, अशी मागणी होते.
जिल्ह्यात लातूर, अहमदपूर, औसा आणि निलंगा असे पाच आगार आहेत. या आगारांसाठी एकूण ४४० बसेस आहेत. लातूर ११३, अहमदपूर ८९, उदगीर ९५, निलंगा ७२, औसा ७१ अशी बसेसची संख्या आहे. त्याद्वारे प्रवासी सेवा सुरू आहे. जिल्ह्याची लोकसंख्या आणि गावांची संख्या लक्षात घेता बसेस वाढविण्याचीही गरज प्रवाशांतून व्यक्त केली जात आहे.
एसटी गावात जाण्यासाठी रस्ता चांगला नसल्यामुळे आठ गावांमध्ये एसटी जात नाही. त्या गावांच्या तीन कि.मी. अंतरापासून एसटी जाते. असे आपल्या जिल्ह्यात आठ गावे आहेत. ९३५ गावांपैकी ही संख्या नगण्य आहे. त्या गावांतही पुढील काळात एसटी धाऊ शकते. - अभय देशमुख, वाहतूक नियंत्रक