निलंगा (लातूर) : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी (बु.) येथील वामनराव केशवराव मादलापुरे (८०) व लक्ष्मीबाई वामनराव मादलापुरे (७५) या वृद्ध दाम्पत्याने आपला अधिकारी मुलगा सांभाळ करीत नसल्याची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. मुलाने दरमहा पोटगी द्यावी, असा दावा त्यांनी केला असून, तपासणी करून यावर निर्णय घेणार असल्याचे उपविभागीय अधिकारी भवानजी आगे-पाटील यांनी सांगितले.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी (बु.) येथील लक्ष्मीबाई व वामनराव मादलापुरे या दाम्पत्यांना तीन अपत्ये आहेत. मोठा मुलगा शेती करतो. दुसरा मुलगा भारत संचार निगममध्ये विभागीय अभियंता या पदावर कार्यरत आहे. मुलगी विवाहित असून, ती सासरी असते. अभियंता असलेला मुलगा गावाकडे आल्यावर आमच्याशी भांडण करून शेतीमाल घेऊन जातो. आमच्या चरितार्थाला दमडीही देत नाही. त्यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. काही दिवसांपूर्वी मी आजारी पडलो. ५० हजार रुपये खर्च आला. उसनवारी करून तो भागविला. मात्र अभियंता असलेल्या मुलाने आम्हाला हाकलून दिले. गावाकडे आल्यावर जिवे मारण्याची धमकी देऊन शेतीचा माल घेऊन जातो, असे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वृद्ध दाम्पत्याने म्हटले आहे.
अभियंता असलेल्या मुलाकडून कायदा कलम ५ प्रमाणे निर्वाह भत्ता महिन्याला २० हजार रुपये मिळावा अशी मागणी त्यांनी केली. मोठा मुलगा शेतमजूर असून, मुलगी विवाहित आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत आमची तक्रार नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात त्यांच्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ होता.
गैरअर्जदारास नोटीस देऊ वामनराव मादलापुरे व लक्ष्मीबाई मादलापुरे यांना त्यांचा अभियंता मुलगा सांभाळत नसल्याचा तक्रार अर्ज आला आहे. या प्रकरणी कायद्याप्रमाणे गैरअर्जदारास नोटीस बजावणे, सुनावणी घेणे व नंतर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल. - भवानजी आगे-पाटील, उपविभागीय अधिकारी