छत्रपती संभाजीनगर : लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल दोन्ही निवडणूक याचिका न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी मंगळवारी (दि.१०) फेटाळल्या.
लोकसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि नगरसेवक आल्टे आणि इतरांनी दुसरी निवडणूक याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी मुख्यत: खासदार डॉ. काळगे यांच्या जातीच्या प्रमाणपत्राबाबत आक्षेप दाखल केला होता.
डॉ. काळगे यांना सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिले होते. तसेच जात पडताळणी समिती सारख्या सक्षम प्राधिकरणाने जात वैधता प्रमाणपत्र दिले होते, या बाबी खंडपीठाने मुख्यत: ग्राह्य धरल्या. शिवाय डॉ. काळगे यांना सक्षम अधिकाऱ्यांंनी जातीचे प्रमाणपत्र दिले नव्हते व सक्षम प्राधिकरणाने वैधता प्रमाणपत्र दिले नव्हते, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांंनी निवडणूक याचिकेसोबत जोडला नाही. त्यांंनी याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे हे निवडणूक याचिकेचे मुद्दे असू शकत नाहीत. तसेच, त्या मुद्दांच्या पुष्ठ्यर्थ पुरावा सादर केला नसल्याच्या कारणाने पहिल्याच सुनावणीत प्रतिवादींना नोटिसा बजावण्याआधीच खंडपीठाने निवडणूक याचिका क्रमांक ३/२०२४ आणि ६/२०२४ फेटाळल्याची माहिती डाॅ. काळगे यांनी अधिकृत केलेले ॲड. प्रताप रोडगे यांनी लोकमतला दिली. तसेच याचिकाकर्त्यांचे वकील तेलगावकर यांनीही खंडपीठाने वरील दोन्ही याचिका फेटाळल्याबाबत दुजोरा दिला.
शाळेच्या निर्गम उताऱ्यात खाडाखोडवंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी डॉ. काळगे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत आरोप केले होते की, खासदार काळगे यांनी त्यांच्या गावाच्या प्राथमिक शाळेच्या निर्गम उताऱ्यात खाडाखोड करून स्वतःची मूळ जात ‘हिंदू जंगम’ ऐवजी ‘जंगम माला’ करून घेतले आणि निलंगा येथील विभागीय अधिकारी यांच्याकडून माला जंगम जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. पुढे याच प्रमाणपत्राआधारे लोकसभेची लातूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले.