उदगीर : दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने विकाराबाद ते परळी या २६७ किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण सुरू केले आहे. या कामाचा विकाराबाद ते खानापूर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
सन २०१८ मधील अर्थसंकल्पात विकाराबाद ते परळी लोहमार्ग विद्युतीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार विकाराबाद- जाहिराबाद-बीदर- खानापूर जंक्शनपर्यंत काम पूर्ण झाले आहे. कामाचा दुसरा टप्पा भालकी- कमालनगर- उदगीर- लातूररोडपर्यंत असून अर्थवर्कचे कामदेखील सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनानुसार डिसेंबर २०२३ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, मार्च २०२२ पर्यंत या मार्गावर विद्युतीकरण पूर्ण होऊन रेल्वे धावण्याची शक्यता आहे, अशी माहिती उदगीर रेल्वे संघर्ष सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. लोहमार्ग विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेचा वेग सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तसेच इंधन बचत व पर्यावरणाच्या रक्षणासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नांदेड- बंगळुरु धावण्याची शक्यता...
विकाराबाद ते परळी विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर नांदेड ते बंगळुरू ही गाडी प्रथम धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्यस्थितीत विकाराबाद ते बंगळुरु हा लोहमार्ग विद्युतीकरण झालेला आहे. आता विकाराबाद ते परळी व परळी ते परभणी लोहमार्ग विद्युतीकरण काम जलद गतीने चालू आहे.