निलंगा (जि. लातूर) : लातूर - बिदर मार्गावरील जाऊवाडी पाटीजवळील एका फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामास शनिवारी सकाळी १०.३० वा. च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात जवळपास ५० ते ६० लाखांचे साहित्य भस्मसात झाले आहे.
निलंगा येथील माजी नगरसेवक शंकर विश्वनाथ भुरके यांचे संतोष इंटरप्राईजेस नावाचे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. त्यांचे जाऊवाडी पाटीजवळ फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूचे व खुर्च्यांचे गोदाम आहे. शनिवारी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोदामामधील इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिकच्या खुर्च्या व गाद्यांनी पेट घेतला. त्यामुळे आग आणखीन भडकली. आगीत एलईडी टीव्ही, फ्रिज, सोफासेट, कुलर, खुर्च्या, कपाट, डायनिंग टेबल, गाद्या, वाॅशिंग मशीन असे जवळपास ५० ते ६० लाखांचे साहित्य जळाले.
गोदामास आग लागून धुराचे लोट निघत असल्याचे या मार्गावरुन ये- जा करणाऱ्या व्यक्तींनी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांना कळविले. त्यांनी तात्काळ गोदाम मालक शंकर भुरके यांना माहिती दिली. तसेच निलंगा पालिकेच्या अग्निशमन दलास आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यामुळे अग्निशमन दल, पालिका कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आग आटोक्यात आणण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, शैलेश वजीर, सतीश सूर्यवंशी, प्रकाश पटणे, नवनाथ कुडुंबले, राजकुमार चिक्राळे, राजू निला, संतोष सोरडे, सौरभ नाईक, महेश धुमाळ, मारुती नागदे, नागनाथ सोरडे आदींनी प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलाचे गंगाधर खरोडे, नागेश तुरे, श्रीकांत कांबळे, मादळे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आग आटोक्यात येईपर्यंत गोदामातील सर्व साहित्य जळाले होते. घटनास्थळास किल्लारी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला.