लातूर : जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कर्मचारी समन्वय समिती, विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने मंगळवार, १४ मार्चरोजी लातुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जाेरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आहे.
लातूर जिल्ह्यातील जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या राज्यव्यापी संपात सहभाग घेतला आहे. सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत विविध संघटनांनी आजपर्यंत मोर्चा, निवेदन, विविध प्रकारचे आंदोलन केले आहे. मात्र, यावर राज्य सरकारकडून कुठललाही सकारात्मक निर्णय घेतला नाही. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत अन्यासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत.त्यासाठी सरकारी कर्मचारी मंगळवार, १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या माेर्चामुळे जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठया प्रमाणावर गर्दी झाली हाेती. एकच मिशन...जुनी पेन्शन...च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.