औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील सोनखेडमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविराेधात महिलांनी एल्गार पुकारत दारू विक्रेत्यांच्या दुकानावर शनिवारी थेट धडक मोर्चा काढला. संतप्त महिलांनी दुकानातील दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडत आंदाेलन केले. गावात दाररू विक्री करू नये, अशी विक्रेत्यांना समज दिली.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. बिनदिक्कतपणे दारू विक्री सुरू आहे. शिवाय, साेनखेड गावातही चार अवैध दारू विक्रीची दुकाने गत अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. गावातील त्रस्त महिलांनी दारू दुकाने बंद करावीत, अशी मागणी प्रशासनाकडे सतत केली. मात्र, ही दारू दुकाने बंद झाली नाहीत. शनिवारी, गावातील अनेक संतप्त महिलांनी एकत्र येत दारू दुकानावर मोर्चा काढला.
यावेळी सरपंच वर्षाराणी सोळंके, उपसरपंच मुद्रीकबाई धुमाळ यांच्यासह अनिता पाटील, स्वाती पाटील, कलावती सोळंके, शीला बोरुळे, अनिता पाटील, पोलिस पाटील दीपक पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक एकंबे, लिंबाजी गुरुजी, सोपान धुमाळ, उत्तम महाराज, शेषराव करताडे, श्रीराम सोळंके यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"