ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 15 - विविध मागण्यांसाठी दलित, ओबीसी, मुस्लिम , भटके विमुक्त आणि आदिवासींच्या स्वाभिमान संघर्ष महामूकमोर्चाचे शहरात आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1.30 वाजता या महा मूकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात जिल्ह्यातील लाखो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या हातातील निळ्या आणि पिवळ्या झेंड्यांनी लातूरकरांचे लक्ष वेधले.
अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, ओबीसी व भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात यावा, मूळ आरक्षणास हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसी, भटक्या विमुक्तांना विधानसभा व लोकसभेत राजकीय आरक्षण देण्यात यावे, तंटामुक्त गाव समिती बरखास्त करण्यात याव्यात, सच्चर समितीचा अहवाल लागू करावा, स्पर्धा परीक्षेतील आरक्षण पूर्ववत करावे, या मागण्यांसाठी हा महा मूकमोर्चा काढण्यात आला आहे.
शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथून या महा मूकमोर्चास प्रारंभ झाला. या महा मूकमोर्चात विविध पक्षांतील मंडळी, कार्यकर्ते यांच्यासह जिल्ह्यातील समाज बांधवांसह लाखो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. क्रीडा संकुल येथून निघालेला हा महा मूकमोर्चा छत्रपती शिवाजी चौक, दयानंद गेट, पाण्याची टाकी मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचवून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले.
फलकांनी वेधले लक्ष
या महा मूकमोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांच्या हाती विविध मागण्यांचे फलक होते. तसेच हातात निळे आणि पिवळे झेंडे होते. या फलकांनी आणि झेंड्यांनी लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. महा मूकमोर्चात सहभागी होण्यासाठी समाज बांधवांची ठिकठिकाणी गर्दी झाल्याचे दिसत होते.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
स्वाभिमान संघर्ष समन्वय समितीने शांततेत हा महा मूकमोर्चा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, महा मूकमोर्चा मार्ग परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर शहरातील वाहतूकही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.