उदगीर शहरातील बसस्थानकासमोरील शिवाजी सोसायटीच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढून तो परिसर खुला करून त्याचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर नगरपालिकेने मंगळवारी सकाळपासून ही मोहीम हाती घेतली आहे. दुसऱ्या दिवशीही पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविणे सुरू होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानकादरम्यान अनेकांनी अतिक्रमण करीत पक्की बांधकामे केली होती. हा चौक अतिशय वर्दळीचा असल्यामुळे, तसेच ऑटोरिक्षाचालक, हातगाडेवाले, भाजी विक्रेते तिथे बसून व्यवहार करीत असल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे या भागातील अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिक वारंवार करीत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, तसेच देगलूर रोड, उमाचौक या भागातीलही अतिक्रमणे काढण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरपालिका प्रशासन कारवाई करीत आहे. ही कारवाई सुरूच राहणार असून, शहरातील इतर भागातसुद्धा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
-भारत राठोड, मुख्याधिकारी