गोविंद इंगळे , निलंगा१९६२ पासून निलंगा विधानसभा मतदारसंघावर निलंगेकर घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. १९९५ चा अपवाद वगळता हे वर्चस्व कायम आहे. घराण्यात फूट पडल्यामुळे निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशीच लढाई गेल्या तीन निवडणुकांपासून पहायला मिळत आहे. यंदाची निवडणूकही निलंगेकर विरुद्ध निलंगेकर यांच्यात झाली असून, या लढाईत पुतण्याने काकावर मात केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून संभाजीराव पाटील निलंगेकर आणि काँग्रेसकडून त्यांचे काका अशोकराव पाटीेल निलंगेकर यांच्यात लढत झाली. अखेर पुतणे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काकांना हरविले असून, तब्बल २७ हजार ५११ मतांची आघाडी घेतली. २००४ च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना नातू संभाजी पाटील यांनी पराभूत केले होते. आताची फाईट काकांबरोबर झाली. त्यात संभाजीराव पाटील यांनी बाजी मारली आहे. १९६२ ते २०१४ पर्यंत बारावेळा या मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील ११ निवडणुकांत निलंगेकर घराण्याची चलती राहिली आहे. आठवेळा स्वत: डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर त्यांचे पुत्र दिलीपराव पाटील यांनी एकवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. १९९५ मध्ये माणिकराव जाधवांचा अपवाद वगळता या मतदारसंघात तब्बल ११ वेळा निलंगेकर घराण्याने प्रतिनिधित्व केले आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. एकंदर, या मतदारसंघात निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशी लढत होऊन निलंगेकर घराण्याचेच वर्चस्व कायम आहे.चौरंगी लढत होईल, असेच वाटत होते. मात्र वास्तवात निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशीच लढाई झाली. विजयी निलंगेकर संभाजी पाटील यांना ७६ हजार ८१७ तर पराभूत निलंगेकर अशोक पाटील यांना ४९ हजार ३०६ मते मिळाली. अपक्ष लिंबनअप्पा रेशमे यांनी १७ हजार ६७५ तर राष्ट्रवादीचे बस्वराज पाटील नागराळकर १६ हजार १४९ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. निलंग्यात भाजपला संधी मिळाली आहे़
निलंग्यात अखेर पुतण्याची काकावर मात
By admin | Published: October 20, 2014 12:20 AM