गरजू १०२ कुटुंबांना कीटचे वाटप
लातूर : शहरातील प्रभाग १० मधील श्याम नगर येथे सामाजिक कार्यकर्ते विजय टाकेकर यांच्या पुढाकारातून क्रांतीज्योती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून १०२ गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यशस्वितेसाठी विजय टाकेकर, संजय क्षीरसागर, अनिल सूरनर, विनोद टाकेकर आदींसह सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हरंगुळ (खु.) येथे सेंद्रीय शेती उपक्रम
लातूर : तालुक्यातील हरंगुळ (खु.) रायवाडी येथे सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबविला जात आहे. जवळपास पाचशे एकर क्षेत्रावर हा उपक्रम यशस्वी झाला आहे. दरम्यान, सोयाबीन बियाणे तयार करण्याचा उपक्रमही या गावांनी राबविला आहे. दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सोयाबीनसाठीही सेंद्रीय शेतीचा उपक्रम राबविला जाणार आहे.
सर फाऊंडेशनतर्फे परिचारिका दिन
लातूर : येथील सर फाऊंडेशनच्या वतीने जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील परिचारिकांचा पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयिका शोभा माने, डॉ. संगीता टिपरसे, डॉ. निकिता जोगदंड, परिचारिका प्रणिता लांडगे, परिचारक शंकर पाडोळे, सर फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सतीश सातपुते यांची उपस्थिती होती. कोरोना काळात आरोग्य कर्मचारी नि:स्वार्थ सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
सार्वजनिक सत्यनारायण भंडारा समितीकडून मदत
लातूर : शहरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी लातूर मार्केट यार्डातील सार्वजनिक सत्यनारायण भंडारा समितीच्या वतीने १ लाख रुपयांची मदत कोविड-१९ फंडाला करण्यात आली आहे. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अशोकसेठ लोया, अशोकसेठ अग्रवाल, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, अजिंक्य सोनवणे, आनंद मालू, सुरेश धानुरे, तुळशीराम गंभिरे, दिनकर मोरे, रमेश सूर्यवंशी, अजय दुडिले, चंद्रकांत पाटील, अमर पवार, लालू कचोळ्या, बालाजी देशमुख, नेताजी जाधव, जितेंद्र दासरे, गुलाब मोहिते आदींची उपस्थिती होती.
वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव
लातूर : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हरंगुळ नवीन वसाहत परिसरात विजेचा लपंडाव नित्याचा झाला आहे. चार चार तास वीज गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था; नागरिकांची गैरसोय
लातूर : तालुक्यातील साई, नागझरी, जेवळी, बसवंतपूर, हरंगुळ (खु.), हरंगुळ (बु.) आदी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. रस्त्याचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
पावसामुळे शेतीची कामे खोळंबली
लातूर : जिल्ह्यात खरीप हंगाम काही दिवसांवर आला असून, शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी तर काही ठिकाणी वादळी वारा असल्याने शेतीची कामे बंद आहेत. परिणामी, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे खोळंबली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.