लातूर : शहरातील अंबाजाेगाई राेडवर असलेल्या अंबा हनुमान परिसरात वास्तव्याला असलेल्या एका अभियंत्याचे घर चाेरट्याने फाेडून तब्बल ६ लाख ६५ हजारांची राेकड पळविल्याची घटना भल्या पहाटे घडली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अनंत शिवाजीराव पाटील (वय ४५) हे लातुरातील अंबाजाेगाई राेडवरील अंबा हनुमान परिसरात एका शाळेसमाेर वास्तव्याला आहेत. घराच्या तळमजल्यावर त्यांचे कार्यालय असून, ते वरच्या मजल्यावर राहतात. दरम्यान, शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ऑफिसमधील काम आटाेपून त्यांनी कार्यालय बंद केले. त्यानंतर ते वरच्या मजल्यावर येऊन झाेपी गेले. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी फिरायला घराबाहेर पडली. ते याेगा करत हाेते. त्यांच्या शेजारी वास्तव्याला असलेले भाडेकरू अनंत पाटील यांच्या पत्नीस फाेन करुन सांगितले, आमच्या दाराला काेणीतरी बाहेरून कडी लावली असून, दरवाजा निघत नाही. त्यामुळे अनंत पाटील यांनी त्यांच्या घराची कडी काढली आणि खाली कार्यालयाजवळ आले असता, त्यांच्या कार्यालयाचा दरवाजाही अज्ञात चाेरट्यांनी ताेडल्याचे आढळून आले. त्याचबराेबर त्या कार्यालयाच्या शेजारी वास्तव्यास असलेले त्यांचे दुसरे भाडेकरू राहुल भागवत पवार (रा. पाथरवाडी ता. रेणापूर) यांचे बंद असलेल्या घराचाही कडीकाेंडा ताेडल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती त्यांनी एमआयडीसी पाेलिसांना दिली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. राहुल पवार यांच्या घराची पाहणी केली असता, चाेरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले. मात्र, घरातून काहीच चाेरीला गेलेले नव्हते. अनंत पाटील यांच्या कार्यालयाची पाहणी केली असता, ड्राव्हरमध्ये ठेवलेली ६ लाख ५० हजार रुपयांची राेकड चाेरट्यांनी पळविली हाेती. तसेच, काॅम्प्युटरचा सीपीयूही चाेरट्यांनी पळविला. याबाबत अनंत शिवाजीराव पाटील यांनी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.