- महेश पाळणे
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी आपले मन खंबीर करणे गरजेचे आहे. सराव जरी बंद असला तरी शारीरिक तंदुरूस्ती व वैयक्तिक खेळातील कौशल्य कसे वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्याचा काळ संकटाचा असला तरी यावर मात करीत खेळाडूंनी मानसिक बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे माजी ऑलिम्पियन तथा लातूर जिल्ह्याचे सुपूत्र कॅप्टन शाहूराज बिराजदार यांनी सांगितले.
मूळचे निलंगा येथील असलेल्या शाहूराज बिराजदार यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी ‘लोकमत’शी बातचित करताना सांगितले, जरी हा संकट काळ असला तरी खेळाडू हा संकटाला डगमगणारा नसतो. शक्यतो घराबाहेर न पडता घरीच तंदुरूस्तीचे धडे घ्यावेत. क्रीडा संकुलही आता मोकळे झाले आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखत वैयक्तिक सरावावर भर द्यावा. अनेक खेळात शरीराशी संपर्क येतो. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखत वैयक्तिक सरावावर भर द्यावा. बॉक्सिंग खेळात जसे शॉडो बॉक्सिंग हा प्रकार आहे. याच धर्तीवर अन्य खेळातही त्या प्रमाणे सराव करून स्पर्धेच्या दृष्टीने स्वत:ला तयार करणे गरजेचे असल्याचेही ध्यानचंद पुरस्कार विजेते शाहूराज बिराजदार यांनी सांगितले.
अपडेट रहाणे गरजेचे...
बऱ्याच खेळाडूंना आपल्याच खेळाचे तंतोतंत नियम माहित नाहीत. या काळात अनेक संघटना ऑनलाईन प्रशिक्षण देत आहेत. याचा आधार घेत आपल्या खेळाचा इतिहास, कौशल्य, नियम यासह अनेक गोष्टीचा अभ्यास करून अपडेट रहाणे गरजेचे आहे. त्यामुळे खेळाडूंचा सर्वांगीण होण्यास मदत होईल.