जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. बोलत होते. या वेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाळे, उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हनभर, कार्यकारी अभियंता संजय कौसटीकर, साहाय्यक आयुक्त वाकुडे, वामन धुमाळ, दाल मिल असोशिएशनचे अध्यक्ष रतन बिदादा, उद्योग समूहाचे अध्यक्ष चंदुलाल बलदवा, सुनील लोहिया, चाकुर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष शेख करीम, सुरेश हाके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना स्थानिक स्तरावरच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी लातूर जिल्ह्यातील उद्योजकांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे. आपल्या उद्योगाला आवश्यक असलेल्या कामगारांची नोंदणी यावर करावी. त्यानुसार कौशल्य विकास विभाग त्या पद्धतीचे कामगार आपल्याकडे पाठवेल व त्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. वीज वितरण कंपनीने एमआयडीसीमधील ज्या डीपी नादुरुस्त आहेत त्यांची तत्काळ दुरुस्ती करून उद्योगांना सुरळीतपणे वीजपुरवठा होईल याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. अतिरिक्त एमआयडीसीमध्ये वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करावयाच्या आहेत, त्याबाबत स्वतंत्र आराखडा सादर करावा यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत वीज वितरण कंपनीला उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले.
डाळीला जी.आय. मानांकनासाठी प्रयत्न...
लातूरमध्ये डाळ मिल उद्योग मोठ्या प्रमाणावर असून लातूरच्या डाळीला जी. आय. मानांकन मिळण्यासाठी दालमिया असोसिएशनने सहकार्य करावे. येथील डाळीला जी.आय. मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिल्या.