ऑनलाइन लोकमत
लातूर, दि, 24 - शहरातील लेबर कॉलनी परिसरात असलेल्या बालसुधारगृहातील सुनिल दगडू गरगरे (२० रा. सिद्घेश्वर नगर, लातूर) याने सोमवारी रात्री उशिरा लघुशंकेचे कारण पुढे करुन काळजीवाहकाच्या हाताला हिसका देवून पलायान केले. या प्रकरणी मदन शिंदे यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील सिद्धेश्वर नगरात राहणाºया सुनील दगडू गरगेवार यांच्या विरोधात लातूरसह बीड, पुणे जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांत अट्टल घरफोडी, दरोडेखोरी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२०/२०१६ कलम ४५७, ३८० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल आहे. पुणे येथील गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या सुनील दगडू गरगेवारला लातूर पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. सोमवारी रात्री लघुशंकेचे कारण पुढे करीत तो झोपेतून उठला. दरम्यान, सोबत असलेल्या काळजीवाहक मदन शिंदे यांच्या हाताला हिसका देत सुनीलने बालसुधारगृहातून पलायन केले. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अट्टल गुन्हेगार...
सिद्धेश्वर नगरात राहणारा सुनील गरगेवार हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात लातूर जिल्ह्यासह शेजारील बीड आणि पुणे जिल्ह्यात दरोडे, चोरी आणि घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पुणे येथील पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर लातूरच्या पोलिसांनी अटक करून तपास कामासाठी लातुरात आणले होते. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती.
सुनीलचे वय २०...
सुनील गरगेवार याचे वय सध्या २० वर्षे आहे. अल्पवयीन गुन्हेगार म्हणून असलेली वयोमर्यादा सुनीलने ओलांडली आहे. शिवाय, तो वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या डायरीवरील अट्टल गुन्हेगार आहे. या अट्टल गुन्हेगाराला बाल गुन्हेगार म्हणून बालसुधारगृहात रवानगी कोणत्या नियमानुसार करण्यात आली, असा प्रश्न आता पोलिसांनाही पडला आहे.