- सूर्यकांत बाळापुरे
किल्लारी ( लातूर) : ३० सप्टेंबर-१९९३ साली झालेल्या प्रलयकारी भूकंपामुळे काही क्षणात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ३० वर्षांनंतरही या घटनेच्या आठवणी काढल्यानंतर अंगावर शहारे येतात अन् तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. या विध्वंसक घटनेनंतर पुनर्वसन झाले. मात्र, आजही मूलभूत सुविधांची वानवा असल्याने व्यथा कायम आहेत. तसेच कायमस्वरुपी घरे, लातूर- धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावांचा विशेष किल्लारी तालुका करुन पॅकेज देण्याचे आश्वासन, भूकंपग्रस्तांना नोकरीत घेण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे.
३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे गणेश विसर्जन करुन शांत झालेल्या किल्लारी व परिसरात उषःकाल होता होता काळरात्र झाली होती. ३० ते ३५ सेकंदात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हाहाकार माजला होता. हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर पशुधनासह पशु, पक्षी आणि अनेक जीवांना प्राणास मुकावे लागले होते. त्या घटनेला आज ३१ वर्षे पुर्ण होत आहे. त्यामुळे किल्लारी आणि परिसरातील गावामध्ये बाजारपेठ बंद ठेवून काळा दिवस पाळला जातो. आज ३१ वर्षांनंतरही गावात पाण्याची समस्या कायम आहे. विकतचे पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. दरम्यान, भूकंपग्रस्त मुलांना दुखातून सावरण्यासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार विनाअट परीक्षा न देता सेवेत सामावून घ्यावे असे आदेश निघाले होते. मात्र, पूढे त्यास अडथळा आणून तीन टक्के आरक्षण केले. त्याचाही फायदा अनेकांना झालाच नाही. परिणामी, अनेकांची वये सरली मात्र, अद्यापही नोकरीचा पत्ताच नाही. आजही ३० सप्टेंबर म्हंटले की अंगावर शहारे येतात. त्यामुळे किल्लारी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
५२ गावांचा तालुका करून विशेष पॅकेज द्यावे...भुकंपग्रस्त महामंडळ स्थापन करून १००० कोटींचा निधी देऊन रोजगार निर्मिती करावी, भूकंपग्रस्त ५२ गावांचा किल्लारी तालुका करावा, भूकंपग्रस्तांसाठी एमआयडीसीत ५ टक्के जागा राखीव ठेवावी, किल्लारी ते एकोंडी रस्त्यावरील तेरणा नदीवर पूल करून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवावा, गावांतर्गत रस्ते, गटारी, सभागृह याची दुरुस्ती करावी. १९९४ पासून आजतागायत भुंकपग्रस्तांचा नोकरी अनुशेष भरून काढावा, किल्लारीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा आदी मागण्या कायम आहेत.
छताला गळती, भूकंपमापक यंत्र नाही...किल्लारीत पुनर्वसनानंतर पक्की घरे बांधून देण्यात आली. मात्र, आता पावसाळ्यात या घरांच्या छताला गळती लागत आहे. काही घरांचा गिलावा गळत आहे. त्यामुळे विटा उघड्या पडत आहेत. तसेच किल्लारी येथे दोन एकरवर भूकंप मापन केंद्रासाठी इमारत उभारण्यात आली. मात्र, अद्यापही तिथे यंत्र बसविण्यात आले नाही. परिणामी, इमारतीची मोडतोड झाली आहे. हे यंत्र कधी उभारणार, असा सवाल उपस्थित होत आहे.