लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांमध्येही कोरोनाचा संसर्ग दिसून येत आहे. लसीकरण नसल्याने लहान मुलांनाच अधिक धोका आहे. त्यामुळे लाॅकडाऊन संपला तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.
लातूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये नव्हता. मात्र यावर्षीच्या फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांचा आलेख उंचावत आहे. गेल्या चार महिन्यात ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ५०० हून अधिक लहान बालके आहेत. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे लहान बालकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घरात कोणीच बाधित नसताना लहान मुले बाधित येण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय, काही मुलांना कुटुंबातील सदस्य बाधित झाला तरी कोरोना झाला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या लाटेत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आदी लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. दरम्यान, लाॅकडाऊन संपला तरी लहान मुलांना बाहेर जाऊ न देणे हेच आरोग्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाची तयारी
जिल्ह्यात लहान बालकांवर कोरोनाचे उपचार करता यावे, यासाठी दोन रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे. तसेच गरोदर मातांसाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी बेड वाढविले जाणार आहेत.
ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी ५०० जम्बो सिलिंडर खरेदी केले जाणार आहेत. तसेच औषधींचाही मुबलक प्रमाणात साठा करून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, लहान मुलांसाठीही विशेष खबरदारी आरोग्य विभागातर्फे घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे काय?
लहान मुलांनाही ताप, सर्दी, खोकला, घशात व नाकात खवखव, जुलाबाचा त्रास, पोट दुखणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. काही मुलांना अंगावर पुरळ येत आहे.
वास न येणे, चव न लागणे, थकवा येणे, जेवण न जाणे ही सर्वात आढळणारी लक्षणेही लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी आवश्यक आहे.
सध्या साैम्य प्रकाराची लक्षणे आढळून येत असली तरी पालकांनी त्वरित मुलांची कोरोना चाचणी करावी. दुखणे अंगावर न काढता त्वरित उपचार घ्यावेत.
लहान मुलांसाठी सध्याला लस उपलब्ध नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. लस उपलब्ध होईपर्यंत पालकांनी योग्य ती खरबदारी घेणे आवश्यक आहे.