लातूर : पॅकबंद पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्या बहुतांश व्यावसायिकांकडे शॉप अॅक्टचाही परवाना नाही़ परवाना देणार्या कोणत्याही शासन विभागाकडे या व्यावसायिकांची नोंदच नाही़ तरीही जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय त्यांच्याकडून खुलेआम सुरू आहे़ ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जारद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकांची यादीच घेतली आहे़ दरम्यान, मनपा आणि अन्न व औषधी प्रशासन संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर कारवाई करणार आहेत़ लातूर शहरासह जिल्ह्यात जारच्या साह्याने सीलंबद पाणी विक्रीचा व्यवसाय करण्यात येत आहे़ या पाण्याच्या कुठल्याही चाचण्या केल्या जात नाहीत़ बोअर, विहीर व पत्र्याच्या शेडमध्ये हा व्यवसाय थाटला आहे़ सुरूवातीला असे व्यावसायिक टँकर, बैलगाडी टँकरद्वारे पाणी विक्रत होते़ आता त्यांनी या व्यवसायाचे आधुनिकीकरण करून जारमध्ये पाणी भरून तो जार सीलबंद करून विकला जात आहे़ यात व्यावसायिकांना मोठा फायदा होत आहे़ मात्र जारमधील पाणी शंभर टक्के शुद्ध असल्याची खात्री देता येत नाही़ शास्त्रीय पद्धतीने या पाण्याचे शुद्धीकरण केले की नाही याची कसलीही पडताळणी कोणीही करत नाही़ ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर मनपाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन जागे झाले आहे़ बुधवारी सकाळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ़महेश पाटील यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागात जाऊन तेथील अधिकार्यांची भेट घेतली़ मात्र या विभागाचे सहायक आयुक्त औरंगाबादला शासकीय कामानिमित्त गेल्यामुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही़ गुरूवारी ते लातुरात आल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व अन्न व औषधी विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक होवून यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे़ दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागाने ‘लोकमत’शी भ्रमणध्वनीवर संवाद साधून अशा व्यावसायिकांची यादी देण्याची विनंती केली़ त्यानुसार त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवून ‘लोकमत’कडून यादी घेतली आहे़ (प्रतिनिधी) जिल्हाधिकार्यांच्या पत्रानंतर प्रशासन कामाला़़़ स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने जारमधील पाणी योग्य आहे की नाही, याची तपासणी अन्न व औषधी प्रशासनाने सुरू केली आहे़ जारमधील पाणी बोअरचे असेल ते दीडशे फुटापेक्षा खालचे आहे की वरचे आहे़ ते कार्पोरेशनचे पाणी आहे की स्वत:चे आहे, या सर्व बाबींचा शोध अन्न व औषधी प्रशासन तसेच मनपाचे अधिकारी घेणार आहेत़ झोनप्रमाणे तपासणी कर्मचार्यांच्या नियुक्त्या करून पाणी विक्री व्यावसायिकांचा पंचनामा केला जाणार आहे़ यात दोष आढळला तर कारवाई करण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी अन्न व औषधी प्रशासनाला कालच पत्र देवून आदेश दिले आहेत़ तीन दिवसांत जारद्वारे पाणी विक्री करणार्या व्यावसायिकांची पडताळणी करा आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, असे फर्मान जिल्हाधिकारी डॉ़ शर्मा यांनी काढले आहे़ त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाचे कर्मचारी कामाला लागले आहेत़
शॉप अॅक्टचा परवाना घेण्याकडेही कानाडोळा !
By admin | Published: May 07, 2014 11:45 PM