लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तिपराळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गटसचिवाने एका शेतकऱ्याच्या नावाने परस्पर कर्ज उचलले. हे प्रकरण ‘लोकमत’ने उचलून धरल्यानंतर अखेर गटसचिवास जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी निलंबित केले. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तिपराळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव उत्तम केरबा बिराजदार याने कानेगाव येथील शेतकरी प्रताप माणिक बंडले यांच्या नावे परस्पर कर्ज उचलले. खोटी सही व दस्तावेज तयार करून हा प्रकार केला. याबाबत ग्राहक तक्रार निवारण मंचने गटसचिवाने उचललेली रक्कम १० हजार २५० रुपये तीस दिवसांच्या आत जमा करावे, असे आदेश दिले होते. या आदेशाचे मुदतीत पालन न झाल्यास द.सा.द.शे. १० टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्याचेही आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचचे होते. दरम्यान, गटसचिव उत्तम बिराजदार याच्याविरुद्ध देवणी पोलिसातही फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा उपनिबंधक ए.एल. घोलकर यांनी गटसचिव बिराजदार यांना निलंबित केले. या काळात जिल्हा सहकारी संस्था लातूर कार्यालयात उपस्थित रहावे, असेही निर्देश आहेत.शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तिपराळ विविध विकास सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव उत्तम बिराजदार याने प्रताप माणिक बंडले यांची खोटी सही करून परस्पर कर्ज उचलले. या प्रकरणी शेतकरी संघटनेने देवणी पोलिस, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाची दखल घेत गटसचिवाची सेवा निलंबित केली आहे.
अखेर गटसचिव निलंबित
By admin | Published: August 21, 2014 1:01 AM