उदगीर येथील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल त्वरित प्राप्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या आरटीपीसीआर तपासणी केंद्राचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे होते. यावेळी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी आ.गोविंद केंद्रे, बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उद्योजक रमेश अंबरखाने, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, लाइफ केअरच्या अध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, प्रा.शिवाजी मुळे, कल्याण पाटील, समीर शेख, बाळासाहेब मरलापल्ले, गणेश गायकवाड, उदय ठाकूर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी केलेल्या सहकार्यामुळे मराठवाड्यात एकमेव उदगीर येथे आरटीपीसीआर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, आरोग्य क्षेत्रात लाइफ केअरचे काम मोठे असून, या हॉस्पिटलमुळे उदगीर व परिसरातील जनतेची मोठी सोय होत आहे. उदगीर शहरात आरोग्याच्या सुविधा आणण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण ताकतीने प्रयत्नशील आहे. सूत्रसंचालन बशीर शेख यांनी केले. आभार रमेश अंबरखाने यांनी मानले.
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास मदत...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लाइफ केअरच्या कामाचे कौतुक करून आरटीपीसीआरची तपासणी उदगीर शहरात होऊन अहवालही लवकरच मिळणार आहे. त्यामुळे कोरोना आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.