जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस सुरू होता. दुसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६५२.१ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात हरंगुळ- ७९.८, कासार बालकुंदा- ८१.३, चाकूर- ६५, वडवळ- ७०.३, झरी- ८७, रेणापूर- ९०.३, पोहरेगाव- ७५.३, कारेपूर- ८५.५, पळशी- ७५.८, देवणी- ९९.८, वलांडी- ९१.३ मि.मी. असा पाऊस झाला आहे. तसेच लातूर मंडळात ६४.३, कासारखेडा ६४ मि.मी. असा पाऊस झाला आहे. याशिवाय, ७ मंडळात ५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे रेणापुरातील काही घरात पाणी शिरल्याने कुटुंबीयांची तारांबळ उडाली होती. रेणा मध्यम प्रकल्पात १५.७६३ दलघमी जलसाठा झाला आहे. त्याची ७१.१९ अशी टक्केवारी आहे.
मांजरावरील दोन बंधारे भरले...
जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीवरील धनेगाव आणि डाेंगरगाव उच्चस्तरीय बंधारे भरले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दोन्ही प्रकल्पावरील दारे उघडली आहेत. तसेच तेरणावरील सर्व उच्चस्तरीय बंधाऱ्यांची दारे उघडण्यात येऊन पाणी सोडून देण्यात आले आहे.
औसा-मुरुड रस्ता बंद...
मुसळधार पावसामुळे औसा शहराजवळील नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने शनिवारी रात्री ८ वा. पासून औसा-मुरुड रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव शिवारातील गॅबियन बंधारा फुटला. त्यामुळे शेत-शिवारात पाणी घुसले होते.
कॅप्शन :
०५एलएचपी लातूर ११ : लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भातखेड्याजवळील मांजरा नदी भरून वाहत आहे.