लातूर : राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रामध्ये हातभट्टी, निर्मितीसाठी लागणारे रसायन, इतर साहित्य असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एकूण ८१ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ७४ जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील हातभट्टी दारु अड्ड्याविराेधात विशेष माेहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणच्या हातभट्टी अड्ड्यांवर धाडी टाकल्या असून, एकूण ४५ गुन्ह्यांची नाेंद केली आहे. याबाबत ४३ जणांना अटक केली असून, ३८०० लिटर हातभट्टी रसायन, १०४० लिटर हातभट्टी, ४०५ देशी दारु, २३० विदेशी दारुसाठा, तीन दुचाकी, एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. ही कारवाई ४ ते ३१ मे दरम्यान केली आहे.
तर १ ते १९ जून दरम्यान केलेल्या कारवाईत ३६ गुन्हे दाखल केले असून, ३१ जणांना अटक केली आहे. ४८५ लिटर हातभट्टी दारु, ६ हजार १०० लिटर रसायन, ५४१ लिटर देशी दारु, ६१ लीटर विदेशी दारु, ४५ लिटर बिअर, २०० लिटर ताडी, एक जीप, एक रिक्षा, तीन दुचाकी वाहने जप्त केली आहेत. मे आणि जून महिन्यात टाकलेल्या धाडसत्रात जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राउत, निरीक्षक आर.एस. काेतवाल, आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के.शिंदे, स्वप्नील काळे, ए.बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, अनंत कारभारी, निलेश गुणाले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एस.जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणवीस, पुंडलिक खडके यांच्या पथकाने केली.