हाळी गावापासून तीन किमी अंतरावर सुकणी हे गाव आहे. शनिवारी सुकणी गावात ८० गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला हाेता. त्याच दिवशी हंडरगुळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत झालेल्या दोन कोंबड्यांचे स्वॅब घेऊन पुणे येथील प्रयाेगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. या काेंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर, सुकणी गावात असलेल्या इतर कोंबड्यांचा पशुसंवर्धन विभागाकडून शोध घेऊन मारून टाकण्यात येत आहेत. मंगळवार व बुधवार या दोन दिवशी तीस कोंबड्या मारल्याचे ग्रामविकास अधिकारी बी.एस. भांगे यांनी सांगीतले.
सुकणी गावाचा हाळी हंडरगुळी गावाशी दैनंदिन संपर्क आहे. हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने पशू व कोंबड्यांची संख्या जास्तीची असल्याचे समजते, शिवाय या परिसरात काही जण पोल्ट्री व्यवसाय चालवतात. त्यामुळे हा संसर्ग हाळी हंडरगुळी परिसरात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रशासनाकडून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
पालकांनी संपर्क साधावा...
हाळी हंडरगुळी गावासह परिसरातील गावात या आजाराचा संसर्ग पसरू नये, म्हणून काळजी घेतली जात आहे. पशुपक्ष्यांना काही लक्षणे जाणवल्यास पशुपालकांनी संपर्क साधावा.
- डाॅ. रेश्मा पाटील, पशुधन विकास अधिकारी, हंडरगुळी