शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : येथील नवीन बसस्थानक शेजारील एका दुकानातील हवा भरण्याच्या मशीनचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, येथील नवीन बसस्थानक शेजारील दुकानावर सोमवारी सकाळी एक ट्रॅव्हल्स टायरमध्ये हवा भरण्यासाठी आली होती. तेव्हा टायरमध्ये हवा भरण्यासाठी मशीन सुरू केल्यानंतर काही वेळातच मशीनचा अचानक स्फोट झाला आणि तिथे उपस्थित असलेला ट्रॅव्हल्सचा क्लिनर लक्ष्मण गरगटले (रा. हेळंब, ता. देवणी) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेत दुकानदार शांतप्पा मठपती हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची शिरूर अनंतपाळ पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.