उदगीर : तालुक्यातील तोंडार पाटी येथे सखुबाई तुळशीराम वाघमारे (वय ५५) यांचा कोयत्याने खून केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद होता. दरम्यान, खुनातील आरोपी हा मयत महिलेचा लहान मुलगाच असल्याचे उदगीर ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, आईच्या नावावरील अडीच एकर जमीन वाटून देत नसल्याने आईचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, २४ फेब्रुवारी रोजी खुनाची घटना उघडकीस आल्यावर ग्रामीण पोलिसांनी मयत महिलेच्या दोन्ही मुलावर बारकाईने लक्ष ठेवले. लहान मुलगा नागनाथ तुळशीराम वाघमारे (वय ३९) याच्या कपाळावर खरचटलेली जखम दिसून आली. तेव्हा पोलीस निरीक्षक पवार यांनी कपाळावर काय लागलंय? असे विचारले असता पत्नीची बांगडी लागली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या पत्नीला विचारपूस केली असता तिने असे कांही घडले नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांची याबाबत खात्री झाली की आरोपी नागनाथ वाघमारे यानेच त्याच्या आईचा खुन केला.
२९ फेब्रुवारी रोजी नागनाथ वाघमारे याला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जागेची वाटणीसाठी आईचा खून केल्याचे कबूल केले. २३ फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने स्वतःच्या आईच्या शरीरावर कोयत्याने १८ ते २० वार करून निर्घृणपणे खून केला. स्वतःचे रक्ताने माखलेले कपडे त्याच रात्री साईधामच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत जाळून टाकले परंतु शर्टाचा एक तुकडा शिल्लक राहिला होता. तो कपडा नातेवाईकांना दाखवल्यानंतर त्यांनी नागनाथ वाघमारे याच्या शर्टाचा तुकडा असल्याचे ओळखले. ग्रामीण पोलिसांनी बारकाईने तपास करून खुनातील आरोपीला अटक करून कलम ३०२ व २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाच्या आदेशाने आरोपीची ६ मार्च रोजी कारागृहात रवानगी करण्यात आली. अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली.