लातूर : राज्यातील १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास ४०६ शिक्षकांच्या तदर्थ पदोन्नतीच्या मुदतवाढीचा प्रश्न वर्षभरापासून रखडला होता. त्यामुळे कोविडच्या संकटाच्या काळात अध्यापनाबरोबरच अहोरात्र रुग्णसेवा देणा-या या कोरोना योद्धांना मानसिक त्रास सहन करण्याबरोबरच वेतनही कमी मिळत होते. परिणामी, सातत्याने पदोन्नतीसाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर राज्य शासनाने तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढीचा आदेश दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणे गरजेचे असल्याने यापूर्वी सहयोगी प्राध्यापक पदावरुन प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापक पदावरुन सहयोगी प्राध्यापक पदावर तात्पुरत्या स्वरुपात शासनाने तदर्थ पदोन्नती दिल्या होत्या. दरम्यान, मार्च २०२० पासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जे प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक तात्पुरत्या पदोन्नतीने कार्यरत होते, त्यांच्या तदर्थ पदोन्नतीच्या कालावधीस प्रशासकीय कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली नव्हती. कोरोनाच्या संकट काळात सदरील वैद्यकीय शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच अहोरात्र रुग्णसेवा केली. मात्र, पदोन्नतीस मुदतवाढ नसल्याने वेतनावर परिणाम होऊन मानसिक त्रासही होत होता. त्यामुळे पदोन्नतीस मुदतवाढ देण्यात यावी, अशी सातत्याने मागणी होत होती.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यापुढे हा प्रश्न मांडण्यात येऊन पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी दखल घेत विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांना तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती द्यावी, असे आदेश दिले. त्यानुसार राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अवर सचिव संतोष देशमुख यांनी सदरील आदेश काढले आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे.
लातुरातील २८ वैद्यकीय शिक्षकांना लाभ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांच्या तदर्थ पदोन्नतीचा प्रश्न वर्षभरापासून प्रलंबित होता. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे ही समस्या मांडली होती. त्यांनी दखल घेऊन हा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे राज्यातील १२४ प्राध्यापक आणि २८४ सहयोगी प्राध्यापकांना लाभ झाला आहे. तसेच लातूरच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २८ वैद्यकीय शिक्षकांना त्याचा लाभ झाला असल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. उदय मोहिते, एमएसएमटीएचे लातूरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी सांगितले.