जिल्ह्यात प्रमुख नदी असलेल्या मांजरा नदीपात्रावर वाळूघाटांची संख्या अधिक आहे. तावरजा, तेरणासह नाले, ओढ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मागील चार वर्षांपासून वाळूला सोन्याचा भाव आल्याने चोरटी वाहतूक वाढली आहे. प्रशासनाचे नियंत्रण उरले नसल्याने मांजरा नदीकाठच्या गावात वाळू विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. पर्यावरणाचा धोका लक्षात घेऊन तालुकास्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार लिलाव थांबविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात उपसाच बंद झालेला नाही. जिल्ह्यात जवळपास ५५ वाळू घाट असून, सर्वाधिक मांजरा नदीवर आहेत.
प्रमाणाबाहेर उपसा झाल्यास धोका...
वाळू घाटाचा लिलाव करताना पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करायला हवा. पर्यावरणीय यंत्रणा बदलणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त उपसा झाला तर भविष्यातील पर्यावरणीय संकटाला सामोरे जावे लागेल. नदीचे पात्रच बदलल्याने पाण्याचा प्रवाह बदलतो. यातून नदीकाठावरील शेतीचे आतोनात नुकसान होते. भविष्यातील संकट टाळण्यासाठी नैसर्गिक रचना कायम राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.