निलंगा (जि.लातूर) : तालुक्यातील सावंगीरा येथील २४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. मयत युवकाच्या खिशात मराठा समाजास आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली असून, किरण युवराज सोळूंके असे युवकाचे नाव आहे.
निलंगा तालुक्यातील सावंगीरा येथील किरण युवराज सोळुंके हा बी.कॉम. पदवीधर असून, मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभागी होता. शासन तारीख पे तारीख देत असल्याने आरक्षण मिळणार की नाही, याची चिंता त्याला लागली होती. त्यामुळे बुधवारी शेतातील ऊसाला पाणी बघून येतो म्हणून तो शेताकडे गेला होता. तेथेच त्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी निलंगा पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करताना किरण सोळूंके यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत आहे असा मजकूर लिहून खाली स्वाक्षरी केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. मयत किरण यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ करीत आहेत.