लातूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक अकाउंट तयार करून अनेकांना गंडविण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यासाठी आता नेटकऱ्यांनीच विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपण वापरत असलेले अकाउंट कोणी हॅक तर केले नाही ना, आपल्या नावाने कोणी बनावट अकाउंट सुरू केले नाही ना, याची माहिती असणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडियावर बनावट अकाउंटची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम आणि इतर माध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता बाळगण्याची गरज आहे. फेसबुकवरील एखादे अकाउंट हॅक करून यातील फ्रेंडलिस्टचा वापर करीत पैशाची मागणी करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. मित्र अडचणीत आहे, त्याला पैशाची गरज आहे म्हणून अनेकांनी त्याच्या बँक खात्यावर पैसेही जमा केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
कोरोना काळात वाढल्या तक्रारी
सायबर सेलसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडे अशा तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून माहिती संकलित केली जात आहे.
माहिती संकलित केल्यानंतर संबंधित तक्रारदारांचे अकाऊंट बंद करण्याची प्रक्रिया केली जाते.
दीड वर्षापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊन, निर्बंधाने गर्दीची ठिकाणे ओसाड दिसून येत आहेत. यातून डिजिटलचा वापर वाढला आहे.
सात दिवसांनंतर होते खाते बंद
एखाद्या नेटकऱ्याची फेसबुक अकाउंटवरून फसवणूक झाल्याची घटना घडली तर त्याबाबत अधिकृत पोलिसांकडे तक्रार दाखल करावी लागते.
पोलीस दलातील सायबर सेलकडे तक्रार आल्यास याची अधिक खोलात चौकशी केली जाते. सायबर सेलच्या माध्यमातून फेसबुकला रीतसर ई-मेल, अर्ज पाठविला जातो. त्यानंतर फेसबुकचे अकाउंट बंद केले जाते.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वेगळे पोर्टल
दीड वर्षापासून ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, फसवणुकीच्या घटनाही घडल्या आहेत. फोन करून एटीएम कार्ड आणि बँकांची माहिती मागवून गंडविण्यात आले आहे.
मोबाइलवर एनीडेक्स ॲप डाऊनलोड करून मोबाइलमधील सर्व डाटा हस्तगत करीत फसवणूक करण्याचे प्रकारही जिल्ह्यात वाढले आहेत.
फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडे मोजक्या तक्रारी दाखल होतात. डिजिटल, ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक करण्याच्या वाढत असलेल्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर...
फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून पैशाची मागणी केल्याच्या घटना घडत आहेत. अशा प्रकरणात तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
फेसबुक अकाउंट वापरणाऱ्यांनी त्यांच्या पोस्ट केवळ मित्रांनाच दिसतील, अशा पद्धतीची सेटिंग करावी. सेटिंगमधील ऑल या ॲप्शनऐवजी ओन्ली फ्रेंड हे ॲप्लिकेशन सलेक्ट करावे.
फेसबुक आणि इतर माध्यम वापरत असताना एखाद्या मित्राकडून पैशाची मागणी होत असेल तर याची खातरजमा करावी. त्यानंतरच मदत करावी.
फेसबुकवरील अकाउंट फेक आहे, असा संशय आल्यानंतर त्याच्याशी कुठलाही संवाद करू नये. तर पोलीस ठाण्यात तक्रार करावी.