शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नासिर लालमहमंद मौजन- मुजेवार (४८, रा. शिरुर अनंतपाळ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, येथील शेतकरी नासिर लालमहमंद मौजन- मुजेवार यांनी अडीच वर्षापूर्वी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेेकडून १ लाख ३० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यातच मुलीच्या लग्नासाठीही खर्च झाला होता. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, अशी चिंता लागली होती. दरम्यान, खरीप आणि रबी या दोन्ही हंगामातून उत्पादन न निघाल्याने आणखीन चिंताग्रस्त झाले. त्यातून त्यांनी रविवार पहाटेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत परवेज नासिर मौजन मुजेवार यांच्या माहितीवरुन येथील पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.