महावितरणच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतक-यांवर आत्महत्येची वेळ, अजित पवार यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 01:11 PM2018-01-19T13:11:24+5:302018-01-19T13:24:35+5:30

MSEBच्या सक्तीच्या वसुलीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या शेतक-याला केली एक लाखाची मदत

Farmer committed Suicides in latur | महावितरणच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतक-यांवर आत्महत्येची वेळ, अजित पवार यांचा घणाघात

महावितरणच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतक-यांवर आत्महत्येची वेळ, अजित पवार यांचा घणाघात

Next

लातूर - महावितरणकडून आता सक्तीने वीजबिल वसूल केले जात असल्यामुळे आणि प्रचंड बिल आकारणी केली जात असल्यानं शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. हल्लाबोल यात्रेदरम्यान लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ही पत्रकार परिषद झाली. यावेळी शहाजी राठोड या शेतकऱ्याच्या तब्येतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर अजित पवार यांनी ही पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली.

'कर्जमाफी नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत नाही, अशा सगळ्या गोष्टीने शेतकरी हैराण झाला असतानाच आता वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे',असे अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातील उजनी गावातल्या शहाजी राठोड या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला,  या शेतकऱ्याची अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन  विचारपूस केली व  उपचारांसाठी त्यांना एक लाख रुपयांची मदतदेखील केली.

शेतकरी आता सरकारच्या चुकीच्या धोरणाचे बळी ठरत आहेत, असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. त्रासून गेल्यानंतर, कंटाळून गेल्यावर, पैसा येणं बंद झाल्यावर माणूस मेटाकुटीला येतो. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. राठोड यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत मागण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आत्महत्या असल्याने अशी मदत करता येत नाही असे शेतकऱ्याच्या नातेवाईकांना सागंण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आत्महत्येचे समर्थन करत नाही. आत्महत्या करणे चुकीचे आहे परंतु अशा दुर्देवी घटना घडल्यावर मदतीची भूमिका ठेवली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

मागील दोन- तीन वर्ष दुष्काळ होता. त्यामुळे याकाळातील बिल पाठवणे योग्य नाही. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मागच्या काळातील बिल पाठवून दिले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. मराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जनता अनेक समस्यांनी त्रस्त असून आता ते हल्लाबोल आंदोलनातून सरकारच्या विरोधात एकवटले आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष मकरंद सावे , पप्पू कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

Web Title: Farmer committed Suicides in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.