शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. लातूर शहरासह जिल्हाभरात सर्वदूर पाऊस पडला. रेणापूर - खरोळा रस्त्यावरील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. दरम्यान, देवणी तालुक्यातील विजयनगर येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी रामराव बोरुळे (३५) हे नेहमीप्रमाणे शेतात म्हैस चारण्यासाठी गेले होते. दुपारी अचानक विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यावर वीज पडल्याने ते जागीच मृत्युमुखी पडले. पावसामुळे शेताच्या परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे सायंकाळपर्यंत कोणालाही याची माहिती मिळाली नाही.
दरम्यान, सायंकाळी पती घरी आले नसल्याने पत्नी अनुसया बोरुळे यांनी शेताकडे जाऊन पाहिले असता, पती मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यावरून देवणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत बालाजी बोरुळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.