शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील अल्पभूधारक शेतकरी माधवराव श्यामराव भंडारे हे सोमवारी आपल्या गावालगत असलेल्या शेतीमध्ये रब्बी ज्वारीची राखण करीत होते. परंतु ज्वारीमध्ये लपून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या वेळी माधवराव भंडारे यांच्या डाव्या पायाला जोरात चावा घेतला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूर येथील एका ब्सजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अगोदरच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यावर उपचार घेण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्यास शासनाकडून मदत देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
वनविभागाने बंदोबस्त करून मदत द्यावी...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा गाव साकोळ मध्यम प्रकल्पामुळे सिंचनाखाली आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही रानडुकराच्या हल्ल्यात साहेबराव बिरादार जखमी झाले होते. त्यामुळे वनविभागाने रानडुकराचा बंदोबस्त करून शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जखमी शेतकऱ्याचा मुलगा योगेश भंडारे यांनी केली आहे.