लातूर: रेशीम शेती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नावनोंदणी करून रेशीम शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केले.
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद रामा अलूरे या शेतकऱ्याच्या एक एकर तुती लागवड केलेल्या रेशीम शेती पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसंचालक (आत्मा) पाटील, रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले, जिल्ह्यात रेशीम शेती करण्यास वाव असून रेशीम कोषाला सोन्याचा भाव आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या महारेशीम अभियानात आपला जिल्हा राज्यात तीन नंबरवर आहे. यावर्षी आपला जिल्हा राज्यात प्रथम यावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे.
एका गावात असावेत १० शेतकरी...
रेशीम अधिकारी बावगे म्हणाले, मनरेगाअंतर्गत एक एकर तुती लागवडीचे अंदाजपत्रक ३ लाख २३ हजार ७९० तीन वर्षांत दिले जाते. यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक असावा व शासननिर्णयानुसार एका गावात कमीत कमी १० शेतकऱ्यांनी रेशीम शेती करणे गरजेचे आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पेाखरा) या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड, किटक संगोपन, गृह बांधकाम व कीटक संगोपन साहित्य याकरिता साधारण लाभार्थ्यांना २ लाख २० हजार २२९ रुपये व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीकरीता २ लाख ६४ हजार २७५ रुपये दिले जाते.