लातूर : खरिपाच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच कांद्यावर निर्यातबंदी लादून शासनाने शेतकऱ्यांना अधिकच अडचणीत आणले आहे, असा आरोप करीत बुधवार दि. २३ रोजी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले. यामध्ये निर्यातबंदी आदेशाची होळी करून रांगोळी घालण्यात आली.
गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी वेळेवर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र काही सोयाबीन कंपन्यांनी दगा दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक जणांना दुबार पेरणी करावी लागली. तर उडीद, मूग या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. मागील आठवड्यातील मुसळधार पावसामुळे सोयाबीनही वाहून गेले.
या नुकसानीचे साधे पंचनामेही प्रशासनाने केलेले नाही. त्यातच आता शासनाने कांदा निर्यातबंदी लादून अडचणीत मोठी भर टाकली आहे, असा आरोप करीत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राख-रांगोळी आंदोलन केले.
आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव मल्लेशे, माजी जिल्हाध्यक्ष माधव कंदे, किशनराव शिंदे, अशोक भोसले, अॅड. संतोष शिंदे, करण भोसले, किशोर महाराज शिवणीकर, विठ्ठल संपत्ते, बालाजी महाके, वसंत कंदगुळे, अण्णाराव चव्हाण, हरिश्चंद्र सलगरे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.