किनगाव : यंदाच्या खरीप हंगामात अहमदपूर तालुक्यात पावसाअभावी पेरण्या उशिरा झाल्या. रिमझिम पावसावरच पिकांनी तग धरला. मात्र, मागील २५ दिवसांपासून किनगाव परिसरात पाऊस नसल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
किनगाव महसूल मंडळात एकूण भौगोलिक क्षेत्र १५ हजार ८०३ हेक्टर असून, १४ हजार २४९ पेरणीयोग्य क्षेत्र आहे. या खरीप हंगामामध्ये तृणधान्य २३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर तूर १ हजार ८८४, मूग १०१, उडीद ३० व इतर २०१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच सोयाबीनची १० हजार ६९२, कापूस ७७ हेक्टरवर आहे. किनगाव महसूल मंडळामध्ये १३ हजार ७५ हेक्टरवर पेरणी झाली असून एकूण ९७.६१ टक्के पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे उसनवारी करून, प्रसंगी कर्ज काढून शेतात पेरणी केली आहे. मात्र, पावसाने गेल्या पंचवीस दिवसापासून उघडीप दिल्याने पिके वाळू लागली आहेत. शासनाने तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व भरपाई देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी अहमदपूर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर व्यंकट कुलकर्णी, श्रीराम श्रृंगारे, अशोक बनसोडे, काशीनाथ बुचडे, दिनकर मुंढे आदींसह शेतकऱ्यांच्या नावे आहेत.
मागील २५ दिवसांपासून पावसाची उघडीप...किनगाव परिसरात मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही, त्यांचा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिकविमा काढलेला असून, पावसाचा खंड या नियमानुसार अग्रीम पिकविमा तसेच पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे. परिसरात दमदार पाऊस झालेला नसल्याने नदी, नाले काेरडेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.