लातूर : ४३ महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारकांना तात्काळ २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिवाळीपूर्वी दिले होते. मात्र, पीकविमा कंपनीने बहाणे करीत ३२ मंडळांना देण्यास सुरुवात केली. पावणेदाेन महिने उलटले तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी जमा झाले नाहीत. बँकेत वारंवार चौकशी करुन शेतकरी हतबल झाले आहेत.
गत खरीपात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांतील सोयाबीन पीकविमाधारकांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले. दरम्यान, पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. तेव्हा विभागीय आयुक्तांसमोर कंपनीने ४३ मंडळांना आग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले. उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करुन सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. वास्तवात, कंपनीने ३२ मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमा करण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत १८३ कोटींचे वितरण...पीकविमा कंपनीने ३२ मंडळातील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांसाठी २०५ कोटी ८८ लाख ६६ हजार ६८१ रुपये मंजूर केले. पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत १८३ कोटी ७४ लाख २६ हजार १९७ रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. अद्यापही २२ कोटी १४ लाख ४० हजार ४८४ रुपये थकित राहिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत. मात्र, पीकविमा जमा झाले नसल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले आहेत.
चाकूर तालुक्याची सर्वाधिक थकित रक्कम...तालुका - मंजूर रक्कम - थकित रक्कमऔसा - ४८ कोटी १२ लाख - ४ कोटी ९ लाखचाकूर - ३८ कोटी ७४ लाख - ७ कोटी २७ लाखजळकोट - ६ कोटी ८७ लाख - ३० लाख ३१ हजारलातूर - ५३ कोटी ७३ लाख - १ कोटी ९९ लाखनिलंगा - ३७ कोटी १ लाख - ३ कोटी ७६ लाखरेणापूर - ६ कोटी ८४ लाख - १ कोटी ९५ लाखशिरुर अनं. - ६ कोटी ७२ लाख - २ कोटी ४४ लाखउदगीर - ७ कोटी ८२ लाख - ३२ लाख १९ हजारएकूण - २०५ कोटी ८८ लाख - २२ कोटी १४ लाख
२८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित...विभागीय आयुक्तांसमोरील बैठकीत पीकविमा कंपनीने ४३ मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आग्रीम देण्याचे मान्य केले होते. मात्र, ऐनवेळी केवळ ३२ मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली. मान्य केलेल्यापैकी ११ आणि उर्वरित १७ अशा एकूण २८ मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.
कंपनीची केंद्राकडे याचिका...पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे धाव घेतली होती. मात्र, ती शासनाने फेटाळली. दरम्यान, कंपनीने आता केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आग्रीमचा पेच आणखीन वाढला असल्याचे दिसून येत आहे.
लवकरच वाटप हाेणार...३२ महसूल मंडळातील काही शेतकरी आग्रीमपासून वंचित आहेत. कंपनीस सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.