लातूर : जिल्ह्यात गतर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसाने उघडील दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची गळती झाली. याचा फटका जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला. पीक विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यात आला. आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आली असून इतर शेतकरी मात्र आपल्या माेबाईलवर कधी मेसेज पडणार याकडे लक्ष लावून बसले आहेत.
खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता. त्यावेळी सोयाबीनचे पीक ऐन फुलोऱ्यामध्ये असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. राशी केल्यानंतर अनेकांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाल्याची पाहणी वेळोवेळी विमा कंपनीकडून करण्यात आली होती. शेवटी पीक कापणी प्रयोग सुद्धा केले. जिल्हाधिकारी स्वतः हजर राहून पीक कापणी प्रत्यक्ष करून घेतले. तो अहवाल कृषी खाते महसूल खाते व संबंधित पीक विमा कंपनी व गावकरी यांच्या समक्ष आणेवारीसाठी सोयाबीनचे प्रात्यक्षिक केले. त्यात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता मे महिन्याच्या २७ तारखेला काही गावांमध्ये चार-पाच जास्तीत जास्त दहा किंवा एखाद्या गावामध्ये दोन-तीन अशा शेतकऱ्यांना फक्त विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे उर्वरित शेतकरी एकमेकांना विचारणा करीत आहेत.
विमा कंपनीचे भरपाईचे नेमके निकष काय...
पिक विमा वाटपासाठी विमा कंपनीचे कोणते निकष आहेत. दोन सख्खे भाऊ असून बंधाऱ्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला विमा आला. एका भावाला विमा आला अन् एक भाऊ पंधरा दिवसांपासून नुसतीच वाट पाहतोय. मोबाईलवर मेसेज आला की पिकविम्याचाच असावा असा समज करून पाहत आहे. असे प्रकार गावोगावी घडत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम न आल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...
शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा वाटप करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, माजी अध्यक्ष राजेंद्र माेरे, अशोक दहिफळे, हिराचंद जैन, नवनाथ शिंदे, गोरोबा मोदी, नारायण भिसे, अण्णासाहेब भिसे, जयराम भिसे, बाळासाहेब वायाळ, महेश वायाळ, व्यंकट निलंगे, राजीव कसबे, रंगनाथ पुजारी आदींनी केली आहे.