रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील कारेपूर महसूल मंडळात अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर खराब झालेल्या सोयाबीनची होळी करण्यात आली. यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले.
किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नवनाथ गाडे, अनंत बरुरे, महादेव बरुरे, लहू गाडे, विजय आरदवाड, हबीब शेख, अजय दाडगे, अविनाश पाटील, राजकुमार हारडे, प्रकाश साबदे, रामकिसन सोमवंशी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
रेणापूर तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील काही भागांतील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. शिवाय, मागील एक-दीड महिन्यापासून सतत पाऊस झाला. कारेपूर महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या सोयाबीनला फटका बसला. काही ठिकाणच्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे कारेपूर मंडळातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे जवळपास ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत म्हणून किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते.
मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या सोयाबीनची होळी करून संताप व्यक्त केला. शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.