लातूर : शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टॅब देण्याची अनोखी योजना लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने हाती घेतली आहे. दहावी, बारावी व विविध स्पर्धा परीक्षेतील टॉप टेन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
लातूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी लातूर उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी विविध योजना आखल्या आहेत. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर बाजार समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील (लातूर तालुका) शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी ‘गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब भेट’ देण्याची योजना हाती घेतली आहे. त्याचा लाभासाठी लातूर तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत, तसेच नीट, जेईई परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी अर्ज करु शकतात. त्यातील टाॅप टेन विद्यार्थांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेच्या सहभागासाठी नियम...विद्यार्थ्याचे पालक लातूर तालुक्यातील शेतकरी असावेत. स्वत:च्या अथवा वडिलांच्या नावे लातूर तालुक्यात जमीन क्षेत्र असावे. विद्यार्थी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असावा. व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (नीट, जेईई परीक्षा पात्र). या आलेल्या अर्जांतून गुणानुक्रमे टॉप टेन विद्यार्थी निवडले जाणार आहेत.
लवकरात लवकर अर्ज करावेत...
अर्जासोबत विद्यार्थ्याच्या स्वतःच्या अथवा पालकांच्या नावावर लातूर तालुक्यात जमीन असलेला ७/१२ व ८ अ उतारा जोडावा. शेतकऱ्यांच्या पाल्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्सची सत्यप्रत जोडावी. ही कागदपत्रे आणि अर्ज ५ फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय कार्यालय, उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती, लातूर येथे सादर करावेत, असे आवाहन बाजार समिती सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले आणि सचिव भगवान दुधाटे यांनी केले आहे.