औराद शहाजानी : परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली असून, शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. पाऊस पडावा, दुष्काळाचे सावट दुर करावे, यासाठी तगरखेडा येथील शेतकऱ्यांनी शनिवारी पायी चालत परिसरातील ११ मारुती मंदिरात पाणी घालून पावसासाठी साकडे घातले.
औराद शहाजानीसह परिसरातील गावांमध्ये महिनाभरापासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत. फुल लागण्याच्या कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी तगरखेडा येथील शेतकऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या गजरात भजन गात तगरखेडा, सावरी, चन्नाचीवाडी, संगारेड्डीवाडी, काेयाजीवाडी, माकणी, माने जवळगा, जिरबवाडी, शिरसी, राजेवाडी, हलगरा या गावातील मारुती मंदिरात पायी पायी जाऊन मारोती रायाला पाणी घालून पावसासाठी साकडे घातले. यावेळी मनाेज स्वामी, किशन बिरादार, विठ्ठल बिरादार, दिगंबर बिरादार, अशाेक पांचाळ, संतोष मुळजे, राजेंद्र पाटील, बाबुराव बाकारे, नामदेव बिरादार, सुरेश बिरादार, शिवाजी बिरादार, महादेव बिरादार, शेषराव बिरादार, श्रीहरी बिरादार, अशाेक बिरादार, दत्ता बिरादार आदींसह ग्रामस्थांचा सहभाग होता.