लातूर तालुक्यातील नागझरी येथे तालुका कृषी अधिकारी महेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी नागझरीतील शेतकरी गोविंद पवार यांच्या शेतात सोयाबीनबीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी प्रतिक पवार, गोविंद पवार, ज्ञानेश्वर पवार, महादेव बिडवे, मनोहर भुजबळ, शंतनू कुलकर्णी, मनोहर मुलगावे उपस्थित होते.
यावेळी लोखंडे यांनी पेरणी करावयाच्या सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासून पेरणीसाठी योग्य असलेल्या बियाणास प्रति किलो तीन ग्रॅम कार्बोक्झीन ३७.५ टक्के व थायरम ३७.५ टक्के यांचे एकत्रित मिश्रण असलेले औषध हलकेसे पाण्याचा शिंतोडा देऊन टाकावे आणि हलकेसे चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरू शकता. ही बीजप्रक्रिया किमान आठ दिवस अगोदर ते एक महिन्यापर्यंत कधीही करून ठेवता येते. बीजप्रक्रिया केल्याने बियाणांची उगवण चांगली होते. रोपाची सशक्त वाढ होते. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते, असेही ते म्हणाले.