यावेळी साळुंके म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा उत्पादनापेक्षा पेरणीसाठी अधिक खर्च झाला आहे. इंधनाचे दर वाढल्याने पेरणी, नांगरणीचा खर्च वाढला. आता सोयाबीन काढणीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे हेक्टरी २० हजार खर्च होत आहे. दरम्यान, ११ हजारांपर्यंत पोहोचलेले भाव अचानक ५ हजारांवर आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केंद्राने विदेशातून सोया डीओसीची आयात केल्याने सोयाबीनचे दर घसरले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान ३६ वर्षे केंद्राने दिले तरी दर घसरल्यामुळे झालेले नुकसान भरून निघणार नाही. केंद्राच्या चुकीच्या धोरणात शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मतदारसंघातील देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा या तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या शेतात काळे झेंडे लावून सोयाबीन सत्याग्रहात सहभागी व्हावे, असे आवाहनही साळुंके यांनी केले. तसेच शहरातील चौकांतही सोयाबीन सत्याग्रह केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, माधवराव पाटील, नारायण सोमवंशी, गिरीश पात्रे, शकील पटेल, सिद्धू बिरादार, तुराब बागवान, आदी उपस्थित होते.