लातूर : मांजरा प्रकल्पातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत नसल्याने उभे ऊसाचे पीक वाळत आहे़ शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी भोईसमुद्रगा (ता़लातूर) येथील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी लातूर-कळंब रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती़
मांजरा प्रकल्पातून शेतीला पाणी मिळावे, यासाठी भोईसमुद्रगा व परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित पाणी वापर संस्थेकडे पैसे भरले आहेत़ परंतु, प्रकल्पाचे पाणी आल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना ते मिळत नाही़ परिणामी, या भागातील ऊस वाळत आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ दरम्यान, भोईसमुद्रगा येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी लघू पाटबंधारे कार्यालयास घेराव घालत हलगीनाद आंदोलनही केले होते़ परंतु, पाण्याची सुविधा करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले़.
या आंदोलनात हणमंत गायकवाड, दत्ता चोथवे, रानबा कांबळे, व्यंकट कारंडे, पिंटू पवार, दिनेश पवार, बापू सरवदे, नारायण गायकवाड, श्रीहरी पवार, महेश साबळे, मनोहर रोंगे, बन्सी पवार, श्रीमंत रोंगे, विकास पवार, गोविंद चोथवे, अण्णा चोथवे, संजय कटारे, विशाल चोथवे, शिवाजी चोथवे, विकास सरवदे, बाबू सरवदे, बबन पवार, रफिक पठाण, अण्णा पवार, श्रावण माने आदी सहभागी झाले होते़.
रस्त्यावर टाकले दगड़यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर दगड व लाकडे टाकून रास्ता रोको आंदोलन केले़ दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेवून आंदोलनकर्त्यांना आपले आंदोलन मागे घेण्यासंदर्भात आवाहन केले़ मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती़