लातूर : तालुक्यातील रायवाडी येथे नापिकी व कर्जबाजारीणास कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, रायवाडी येथील शिवाजी ज्ञानोबा पवार (४५) यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. त्यांना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शिवाजी पवार यांना मयत घोषित केले. रूग्णालयातून आलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, नातेवाईक म्हणाले, शिवाजी पवार यांना रायवाडी शिवारात दोन एकर जमीन असून, यावर्षी पाऊस नसल्याने पेरणीही झाली नाही. सोसायटी व खाजगी बँकेचे त्यांच्यावर कर्ज आहे़ शिवाय, एक मुलगीही लग्नाला आली आहे. दोन मुले मजूरी करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पेरणीसाठी म्हैस विकून खत आणि बियाणे आणले होते. मात्र पाऊसच नसल्याने पेरणीही झाली नाही़ आर्थिक विवंचनेत येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.