लातूर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी लातुरात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी लातुरात रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, मका, पामतेल, दूध भुकटीसह इतर शेतमाल आयात करण्याच्या निर्णयामुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. यातूनच शेतकरी नागवला गेला आहे. आर्थिक संकटात अडकल्याने ताे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या आत्महत्या राेखण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे लागणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धाेरण राबवावे लागणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराज शिंदे पाटील, ॲड. विजयकुमार जाधव, माणिक गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.
महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही...नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग असताना पुन्हा शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? असा सवाल करत माजी खा. शेट्टी म्हणाले, हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरविण्याचाच प्रकार आहे. शेतकऱ्यांचा बळी देऊन हा महामार्ग कशासाठी? यातून काेणाला काय मिळवायचे आहे, हेच समजत नाही, असेही ते म्हणाले.
शेतकरी हिताच्या याेजना जाहीर करा...राज्य सरकारने नकाे त्या याेजना जाहीर करण्यापेक्षा शेतकरी हिताच्या याेजना जाहीर कराव्यात. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येतील. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची सरकारची जबाबदारी आहे. मात्र, तेच सरकार करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.